सावंतवाडी : हे प्रदर्शन मराठा व ओबीसी प्रवर्गातील व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी चे तालुकाध्यक्ष तसेच सावंतवाडी मराठा समाजाचे नेतृत्व श्री अभिषेक सावंत यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे असे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री अॅड सुहास सावंत यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अनेक बेरोजगार युवक-युवतींना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. युवक, महीलांना कर्ज उपलब्ध होऊन स्वतःचे वाहन खरेदी करत स्वतःचा व्यवसाय करता येणार आहे. यासाठी आयोजकांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत असे मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथील कमर्शियल व्हेईकल एक्सपोचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या आणि सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर आज शनिवारपासून तीन दिवसीय कमर्शियल व्हेईकल एक्सपो आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाकडून करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
या एक्स्पोमधून मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज प्रतिपुर्ती योजना लागू केलेली आहे. या योजनेच्या धर्तीवर ओबीसी वर्गाकरीता महाराष्ट्र शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून व्याज प्रतिपुर्ती लाभार्थ्यांना दिली जाते. या दोन्ही योजनांमधून कर्जावरील व्याज हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते. याचा अनेकांना लाभहोणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी चे तालुकाध्यक्ष श्री अभिषेक सावंत,माजी नगराध्यक्ष संजू परब, महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर बस वाहतूक महासंघ मुंबईचे अध्यक्ष प्रकाश गवळी,मराठा महासंघाच्या उद्योग व व्यापार आघाडीचे अध्यक्ष पुंडलिक दवळी, जिल्हा उपाध्यक्ष सोनू गवस,दोडामार्ग तालुकाध्यक्ष उदय पास्ते, मनोहर येरम, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, वैभव जाधव, प्रा. सतिश बागवे, रुजूल पाटणकर, अशोक दळवी, उमाकांत वारंग, अपर्णा कोठावळे, संजय लाड, अखिलेश कोरगावकर, प्रशांत ठाकुर, दिगंबर नाईक, आनंद नाईक, अभिजीत सावंत,प्रशांत राऊळ,विशाल सावंत, बापु राऊळ, शांताराम पारधी आदी उपस्थित होते.













