मेळघाट: जग आधुनिकतेकडे वळत आहे.रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत.वैद्यकीय क्षेत्रातही शास्त्रज्ञांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी अजूनही अज्ञानाचा अंधकार पुसलेला नाही. या अज्ञानामुळे कित्तेक लहान मुलांचा बळी गेला आहे.अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.अवघ्या 22 दिवसांचं बाळ आजारी पडल्याने घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी विळा तापवून अक्षरशः 65 वेळा बाळाच्या पोटावर डागण्या दिल्याची धक्कादायक घटना घडलीय .मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गावातून हा संतापजनक प्रकार समोर आलाय . या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरीवरून हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले .त्यानंतर तिथून अचलपूरला नेले . आता अखेर अमरावतीमध्ये डफरीन रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले .
काय आहे सविस्तर वृत्तांत?
सिमोरी गावातील रहिवाशी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना 22 दिवसांचे बाळ आहे .बाळ आजारी पडल्याचं कळताच घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी बाळाच्या पोटावर विळा गरम करून अक्षरशः 65 वेळा चटके दिले .त्यामुळे बाळाचे प्रकृती बिघडली .त्यामुळे घाबरून जाऊन बाळाला सिमोरीवरून हतरूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं .त्यानंतर बाळाला हतरू येथून अचलपूरला आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे .या घटनेची माहिती उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली असून बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय .
कुपोषण आणि बालमृत्यू दरात मेळघाट कायम अपयशी
या घटनेमुळे बालमृत्यू, कुपोषणासोबतच मेळघाटातील घरगुती उपायाने किती जीवघेणे प्रकार घडू शकतात हे समोर आले आहे. मेळघाटात आरोग्य यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च होतो पण कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात हा विभाग सातत्याने अपयशी ठरलाय . कधी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने होणाऱ्या गर्भवती स्त्रियांचे मृत्यू ,अज्ञान आणि अंधश्रद्धेतून होणारे घरगुती उपायही जीव घेणे ठरत असल्याचं समोर येत आहे .शासकीय आकडेवारीनुसार मार्च 2020 ते सप्टेंबर 2024 पर्यंत मेळघाटात 818 बालमृत्यू आणि 24 मातामृत्यू झाले आहेत .मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा या साऱ्या प्रकारावर लक्ष वेधले गेले आहे .













