चर्मकार समाज उन्नती मंडळाची पोलिसांकडे मागणी
सिंधुदुर्ग:- स.ह.केळकर महाविद्यालय देवगडचे प्राध्यापक श्री.सचिन दहीबावकर हे चर्मकार समाजाचे असल्याने त्यांना नोकरीतून कमी करणेसाठी प्रयत्न करणे,त्यांचे प्रमोशन रोखणे तसेच वारंवार त्यांना नाहक त्रास देणे या प्रकरणी एट्रोसिटी गुन्हा कॉलेजचे संस्था सभापती व प्रिन्सिपल यांचेसह सहा जणांवर देवगड पोलीस ठाण्यात दाखल झाला असून सदर आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली श्री.घन:श्याम आढाव यांचेकडे केली आहे.
सन २०१७ पासून प्राध्यापक श्री.दहीबावकर यांचेवर या ना त्या प्रकारे कॉलेज प्रशासनाने अन्याय करणे चालू ठेवले आहेत.सुरुवातीला याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करून घेण्यात टाळाटाळ करण्यात आली होती.मात्र श्री.दहीबावकर व चर्मकार समाज उन्नती मंडळाने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केल्यावर त्याची सुनावणी होऊन आयोगाने पोलिसांना एट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संस्थेचे सभापती व प्रिन्सिपल यांचेसह काहींवर गुन्हा दाखल झाला असून सदर आरोपींना तात्काळ अटक करावी,कॉलेजचे रेकॉर्ड ताब्यात घ्यावे अशा मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आढाव यांना शिष्टमंडळासह चर्मकार उन्नती मंडळाने सादर केले.यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,सदस्य आनंद जाधव,विठ्ठल चव्हाण,प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते.













