बारमध्ये दारूच्या नशेत एकावर सुरी हल्ला

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु; संशयिताला अटक

गोवा : नादोडा येथे एका बारमध्ये शुल्लक कारणावरून सुरी हल्ल्याचा प्रकार घडला. यात सर्वेश संतोष बागकर (३४, कोलवाळ) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित आरोपी नीरज भीमराव हरगापुरे (३८, नादोडा) याला अटक केली आहे.

ही घटना शुक्रवारी ७ रोजी रात्री उशिरा ११.५० च्या सुमारास घडली. संशयित आरोपी नीरज व जखमी सर्वेश हे दोघे संगम बारमध्ये बसले होते. दारूच्या नशेत संशयित नीरज हरगापुरे याने सर्वेश बागकर यास तू आमच्या गावात का आलास असे म्हणत चिढवण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. प्रकरण हातघाईवर गेले. यावेळी नीरजने सर्वेशवर सुरी हल्ला केला. यात सर्वेशच्या नाक, हात व शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा झाल्या. त्याला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. नंतर येथून त्याला गोमेकॉत हलविण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

जखमी सर्वेश याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी शनिवारी सकाळी संशयिताविरूध्द भा.न्या. सं.च्या ५३२ व ११८ (२) कलमान्वये गुन्हा नोंद केला. त्यानंतर संशयित नीरज हरगापुरे यास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू जाधव हे करीत आहेत

error: Content is protected !!