मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राज्य कारभारात सक्रीय झाले आहेत. सरकारच्या सर्व विभागांचा 100 दिवसांचा रोड मॅप काय असणार याचा आढावा ते सध्या घेत आहेत. त्यातच मागील सरकारमध्ये झालेल्या कारभाराचीही चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरु केली आहे.
राज्य सरकारच्या डोळ्यात धुळफेक
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्य परिवहन खात्यामध्ये 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. एसटीसाठी 1310 बसची खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.एसटी महामंडळासाठी 1310 बस खरेदी करण्याच्या प्रक्रियेची, निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे सादर करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बस खरेदीसाठी 21 विभागांनी विभागनिहाय निविदा काढण्याचे आदेश संचालक मंडळाने दिले होते. त्याला तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. मात्र महामंडळ स्तरावर अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचे समोर आले. राज्य सरकारच्या डोळ्यात धुळफेक करुन परिवहन महामंडळाने बस गाड्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता केली. काही ठराविक ठेकेदाराना फायदा होईल यासाठी हे केले गेल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले आहे. यामुळे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तीन विभागात क्लस्टर निविदा काढण्याचा निर्णय
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने 2023 मध्ये विभागनिहाय 1310 बस खरेदीचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावाला 2024 मध्ये एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली होती. या प्रस्तावतील अटी, शर्तीमध्ये बदल करुन संचालक मंडळाने मुंबई, पुणे-नाशिक आणि अमरावती-नागपूर या तीन विभागात क्लस्टर निविदा काढण्याचा निर्णय घेतला. ठेकेदारांसाठी निविदेतील अटी -शर्ती बदलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांचीच बदली करण्यात आली आणि निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर आता परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी यांनी या निविदा प्रक्रियेतील कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणात काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.