शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. “26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल,” असे परिपत्रकात नमूद केलं आहे.
या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत, यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभातफेरी, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य, चित्रकला, निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत, असं पत्रकात म्हटलं आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.













