पैशांच्या वादातून एकाचा खुन

सिंधुदुर्गनगरी : मूळ पश्चिम बंगाल येथील दोन कामगारांमध्ये मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादात संशयित आरोपी भीम धर्मदास मुजुमदार सध्या रा. कुंभारवाडी कुडाळ याने रानबांबुळी सिमरेवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या उत्तर काशीराम सरकार रा. पश्चिम बंगाल याच्या डोकिवर आणि तोंडावर लोखंडी सळीने जबरी मारहाण करून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून न्यायलयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


याबाबत हकिगत अशी की, मूळ मूळ पश्चिम बंगाल येथील मयत – उत्तम सरकार, सध्या रा. रानबांबुळी सिमरेवाडी आणि संशयित भीम मुजुमदार, सध्या रा. कुंभारवाडी कुडाळ हे दोन्ही कामगार आहेत. यातील मयत उत्तम हे रानबांबुळी येथील बापूजी यशवंत तोरसकर यांच्या चाळीत भाड्याने राहत होते. या भाड्याच्या खोलीत २४ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८:३० ते रात्री १०:४५ वा. सुमारास संशयित आणि मयत यांच्यात मजुरीच्या विषयावरून वाद झाला. यावेळी भीम याने लोखंडी सळीने उत्तम यांच्या डोकिवर आणि तोंडावर वार केले. यात उत्तम हे गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडले. यावेळी संशयित भीम याने खोलीतील रक्ताचे डाग फुसुन टाकले होते. बेशुद्धावस्थेत असलेल्या उत्तम यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान उत्तम यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रवींद्र रामचंद्र पाटील यांनी आज सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित भीम यांच्या विरोधात भारतीय न्याय् संहिता १०३ (१), १०३ (ए), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयिताला आज ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीसांनी आज घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी शेखर लव्हे, पोलीस कर्मचारी, तपासणी पथक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!