कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त !

डिजिटल अंगणवाडी आणि भटक्या कुत्रांनाही बसणार आळा

कुडाळ न प च्या सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती

कुडाळ : कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे. त्याच बरोबर कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कुडाळ शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांची हि पत्रकार परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उप नगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक संतोष शिरसाट, उदय मांजरेकर, श्रुती वर्दम, सई काळप, श्रेया गवंडे, ज्योती जळवी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मंदार शिरसाट म्हणाले, गेल्या आठवड्यामध्ये कुडाळ नगर पंचायतीच्या सभापतीपदाच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथम कुडाळ शहरांमध्ये महत्त्वाचे दोन प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामधील एक म्हणजे कुडाळ शहरांमध्ये मच्छरांचे प्रमाण गेल्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये मच्छरमुक्त कुडाळ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत कुडाळ मध्ये जिथे मच्छर उत्पत्ती होत असलेले पाण्याची स्रोत आहेत हे नगर पंचायतीच्या माध्यमातून निश्चित करून येणाऱ्या नवीन वर्षात शहरांमध्ये ४० हजार गप्पी मासे शहरांमध्ये ड्रेनेजच्या पाण्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी नगरपालिकेमध्ये गप्पी मासे पैदास केंद्र असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या ८ जानेवारीला याचा पहिला टप्पा म्हणून कुडाळ शहरांमध्ये १ हजार गप्पी मासे हे आम्ही सोडणार आहोत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फेब्रुवारीमध्ये १ हजार गप्पी मासे सोडणार आहोत आणि मार्चपासून सर्व सोसायटी आणि ज्या ठिकाणी मच्छर असेल त्या कुडाळ शहरातील नागरिकांना गप्पी मासे आमच्या पैदास केंद्रामधून एक वार ठरवून मोफत स्वरूपात दिले जाणार आहेत. या अभियानातून कुडाळ शहरातील मच्छर हे पूर्णपणे संपवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे श्री. शिरसाट यांनी सांगितले.


तसेच नगर पंचायतच्या माध्यमातून पहिल्या वर्षी भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली पण तरीसुद्धा कुडाळ शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढती आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कुत्र्याची नसबंदी आणि कुत्र्यांची संख्या कमी करण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेत आहोत, असे श्री. शिरसाट म्हणाले.
तसेच कुडाळ शहरांमध्ये साधारण १४ अंगणवाडी शाळा आणि या अंगणवाडी शाळेमध्ये साधारण २०० पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत. अंगणवाडी मध्ये साधारण तर साधारण गरीब मुले या शिकतात. मुलांसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आणि माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ शहरांमध्ये एक डिजिटल अंगणवाडी उभारणार आहोत. अशा प्रकारची अंगणवाडी जिल्हयांतील पहिलीच असणार आहे. असे मंदार शिरसाट यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *