बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
आ.दीपक केसरकर यांनी केले आवाहन
सावंतवाडी प्रतिनिधी: बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्कदिनी मंगळवारी १० डिसेंबर रोजी सिंधुदुर्गनगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
हिंदू महिलांवर होत आहेत अमानवीय पद्धतीने अत्याचार
बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावर कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवरही अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत. तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध आदी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना कट्टरतावाद्यांनी जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे.बांगलादेश सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमती देताना दिसून येत आहे. या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय मूक यात्रा
या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंनाही बांगलादेशच्या सरकारने देशद्रोह्यांची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे.त्यांना तत्काळ सोडावे तसेच बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांचा होणारा छळ थांबावा, या मागणीसाठी ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय मूक यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या बांगलादेशमधील हिंदूंना भक्कम पाठिंबा दाखवावा, असे आवाहन आमदार केसरकर यांनी केले आहे.