“त्या” पोलीस पाटील रणरागिणीने उधळला जुगाराचा डाव

जुगाराच्या साहित्याला चक्क लावली आग

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील शहरालगतच्या एका गावात जत्रेदरम्यान सुरू असलेला जुगाराचा ‘डाव’ एका कर्तव्यदक्ष पोलीस पाटील महिलेने चक्क उधळून लावला. वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रणरागिणीचे रूप घेत तिने जुगाराचे साहित्य अक्षरशः जाळून टाकले. तिच्या या कारवाईबाबत सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

काय आहे साविस्तर वृत्तांत?

शहरालगतच्या एका गावात शुक्रवारी रात्री जुगाराचा डाव चांगलाच रंगात आला होता. जुगाराला प्रतिबंध असल्याने सावंतवाडी पोलिसांनी तालुक्यातील सर्वच पोलीस पाटिलांना अशा प्रकारची घटना घडल्यास त्याला अटकाव करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच त्या भागातील महिला पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचत त्यांनी संबंधितांना तो प्रकार त्वरित बंद करण्याच्या सूचना केल्या. तसेच याबाबतची माहिती पोलीस ठाण्याला दिली. सुरुवातीला नकार देत अखेर त्यांनी जुगार बंद केला.मात्र त्यानंतर मध्यरात्री बाराच्या सुमारास पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुन्हा डाव रंगला. याची माहिती मिळताच संबंधित महिला पोलीस पाटील त्या ठिकाणी गेल्या. यावेळी संबंधितांबरोबर त्यांची किरकोळ बाचाबाची झाली. वारंवार सूचना करूनही त्यांनी त्याकडे डोळेझाक केल्याने संतापलेल्या पोलीस पाटील यांनी अखेर आपला अधिकार वापरत जुगाराचा डाव उधळला. तर सर्व साहित्य एकत्र करीत त्याला अक्षरशः आग लावली. त्यांचे ते रुप पाहून संबंधित जुगारी मंडळी व त्यांचे सहकारी यांनी पलायन केले. काही वेळानंतर पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले मात्र तो पर्यंत सर्व जणांनी तिथून पोबारा केला होता.या घटनेची खुमासदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनीही या घटनेला दुजोरा दिला. जुगारावर पूर्णपणे बंदी असून अशा घटना निदर्शनास आल्यास स्थानिकांनी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच संबंधित महिला पोलीस पाटील यांच्या कर्तव्यदक्षपणाचे व धैर्याचे देखील पोलिसांनी कौतुक केले आहे.

error: Content is protected !!