महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जनसेवा व विकासाच्या दृष्टीकोनातून एकसंघ काम करावे
मताधिक्य व अन्य कोणत्याही गोष्टीवरून टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये
मालवण : मालवण कुडाळच्या जनतेला अभिप्रेत असलेले काम आपल्याकडून व्हावे ही जबाबदारी येणाऱ्या काळात आपली आहे. जनतेने आपल्यावर मोठी जबाबदारी देत जो विश्वास दर्शवला त्यानुसार जनतेशी बांधील राहून विकासकामांना प्राधान्य राहील. गावागावात विकासाचा जो शब्द आम्ही महायुतीच्या माध्यमातून दिला तो पुर्ण केला जाईल. अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली.
महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनतेची विकासकामे गतिमानरित्या पुर्ण होण्यासाठी एकत्रितपणे काम करावे. हेच लक्ष ठेवले पाहिजे. निवडणुक निकाल लागला आहे. विजयी मताधिक्य देऊन जनतेने आपल्याला कौल दिला. त्यामुळे मताधिक्य एक मताचे कि लाखाचे हा विचार करताना लोकशाहीत जनमताचा अनादर करू नये. कुठे जास्त मताधिक्य, कुठे कमी मताधिक्य असेल त्याचा विचार करताना आपापसात कोणावरही टीका टिप्पणी, चिखलफेक करू नये. निवडणुक काळातील सर्व माहिती, मताधिक्य आकडेवारी सर्व पक्षाकडे, वरिष्ठ नेत्यांकडे आहे. त्यावर योग्य ते चिंतन ते करतील.
मात्र जनतेने जो विश्वास आपल्यावर दर्शवला, विकासकामे करण्याची जी जबाबदारी दिली ती पुर्ण करायची आहे. विकासकामा बाबत आमच्यावतीने जे जे शब्द दिले ते ते सर्व पुर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे.
त्यामुळे भाजपा, शिवसेना पदाधिकारी यांनी येणाऱ्या पाच वर्षात जनतेच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करावे. निवडणुक निकालाचे विश्लेषण अथवा मताधिक्य वरून आपापसात कोणतीही टीका टिपण्णी नको. आपली बांधिलकी आता मालवण कुडाळच्या जनतेशी आहे. मालवण कुडाळच्या गतिमान विकासाची आहेत. असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.













