गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५०० लाभार्थींना लाभ

सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी: सिंधुरत्न समृद्ध योजना सन 2024-25 अंतर्गत गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत मंजूर 3 कोटी निधीतून जिल्ह्यातील 1500 लाभार्थीना माती मळणी यंत्र व कलर स्प्रे गन खरेदी करण्यासाठी अर्थसहय्य दिले जाणार आहे.

जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद

सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गणपती शाळांच्या सक्षमीकरणासाठी यंत्र खरेदी करण्यासाठी 75 टक्के अर्थसहाय्य देणे योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जि. प. ग्रामपंचायत विभागामार्फत या योजनेच्या लाभासाठी 10 ऑगस्ट 2024 पूर्वी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेला जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून 1839 मूर्तिकारानी आपले प्रस्ताव विहीत मुदतीत सादर केले आहेत.

75 टक्के अनुदान अथवा 20 हजार रुपये अनुदान देण्याची मर्यादा

दरम्यान, या योजनेसाठी शासनाने 3 कोटी रु. निधी मंजूर केला. मात्र, विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने निवड झालेल्या पात्र लाभर्थ्याना या योजनेच्या लाभासाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र आचारसंहिता संपताच या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टिने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंधुरत्न योजनेंतर्गत गणपती शाळांच्या सक्षमीकरणासाठी यंत्र खरेदी करण्यास अर्थसहाय्य करण्यासाठी 75 टक्के अनुदान अथवा 20 हजार रुपये अनुदान देण्याची मर्यादा आहे. त्यानुसार या प्रस्तावित योजनेअंतर्गत गणपती शाळेसाठी आवश्यक माती मळण्याचे यंत्र किंवा एअर कॉम्प्रेसर (कलर गन) साठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त आहेत. त्याची छाननी होऊन पात्र 1500 लाभार्थीची निवड प्रशासनाने केली आहे.

जिल्ह्यातील किती लाभार्थ्यांना मिळाला लाभ

कणकवली 282, कुडाळ 428, देवगड 232, मालवण 293, दोडामार्ग 52, वेंगुर्ला 190, वैभववाडी 87, सावंतवाडी 275 असे एकूण 1839 प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

error: Content is protected !!