तरुणाचा मृतदेह आढळला सडलेल्या अवस्थेत

वैभववाडी तालुक्यातील घटना

वैभववाडी : सांगुळवाडी खालचीवाडी येथील मंगेश वासुदेव रावराणे वय 46 वर्ष या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्याच्या राहात्या घरात आढळून आला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत त्याचा चुलत भाऊ दिलिप तुकाराम रावराणे यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळाली नाही.

मयत मंगेश रावराणे हा अविवाहित होता. तो वैभववाडी येथे एका हॉटेल मध्ये कामाला होता. शुक्रवारी सकाळी त्याचा चुलत भाऊ दिलीप रावराणे हे मुंबईवरून गावी आले. मयत मंगेश व त्यांचे एकच घर आहे. घरी आल्यानंतर घराच्या पुढच्या दरवाजाला आतून कडी लावून बंद केलेला होता. त्यांनी मयत मंगेश याला हाक मारून पाहिली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच घरातून दुर्गंधी येत होती. त्यांनी याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. ग्रामस्थांनी सिमेंटचा असलेला दरवाजा फोडून पाहिले असता, मंगेश याचा मृतदेह सडलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्य ताब्यात देण्यात आला. मात्र त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.

error: Content is protected !!