या पुढेही शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे केले स्पष्ट
वेंगुर्ले | प्रतिनिधी : शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख पदाचे नितीन मांजरेकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला पक्षकार्यास आवश्यक तेवढा वेळ देता येत नसल्याने पद सोडत असल्याचे त्यांनी जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
रविवारी झालेल्या वेंगुर्ले शिवसेनेच्या मासिक सभेत हे राजीनामा पत्र उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्या स्वाधीन करण्यात आले.
तथापि, आपण पुढेही शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे मांजरेकर यांनी स्पष्ट केले. तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आमदार दीपक केसरकर यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या सर्वांचा आपण आयुष्यभर ऋणी राहीन, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.