पैशांचा खेळ फसला, गाड्या फोडल्या!

सावंतवाडीत ‘कोटींचं महायुद्ध’!

आलिशान बंगल्याजवळ रणांगण !

पैशांच्या फसवणुकीवरून दोन गट भिडले

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री कोटींच्या व्यवहारावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीने एकच खळबळ उडवली आहे. या घटनेमागे आर्थिक फसवणुकीचा मोठा गुंता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परजिल्ह्यातील काही इन्व्हेस्टर्सनी शहरातील एका आलिशान बंगल्यावर मोर्चा काढत ‘आपले पैसे परत द्या’ अशी मागणी केली. या दरम्यान झालेल्या वादातून परिस्थिती इतकी चिघळली की, फ्री स्टाईल हाणामारीचं रूप धारण केलं.

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास काही गाड्या मोठ्या वेगात सर्वोदय नगर भागात दाखल झाल्या. त्यानंतर जोरात आरडाओरड, ढकलाढकली, आणि वाहनांची तोडफोड सुरू झाली. ‘कोटींच्या कोटी’च्या व्यवहारावरून या दोन गटांत बराच काळ वाद सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. “बंगला फोडण्यासाठी आले होते” अशीही चर्चा शहरभर रंगली.

घटनास्थळी सावंतवाडी पोलिसांनी धाव घेत हाणामारी शांत केली. पोलिसांकडून पंचनामा सुरू असून काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शहरात ‘करोडपती महासागर’ आणि ‘वाडीचा करोडपती’ अशा चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकजण आपले पैसे अडकले की काय याची चौकशी करत आहेत.

पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, “फसवणुकीच्या फाईल” लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!