घावनळे येथील घटना
सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान
कुडाळ : चरण्यासाठी सोडलेल्या म्हैशीला तुटलेल्या विद्युत भारीत वाहिनीचा स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घावनळे – भोईवाडा येथे शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. तेथीलच भालचंद्र अनंत सावंत यांच्या मालकीची सदर म्हैस असून यात त्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. भालचंद्र सावंत यांनी आपली गुरे आपल्या घरापासून काही अंतरावर चरण्यासाठी सोडली होती. दरम्यान याच भागात एक थ्री फेज वाहिनी तुटून पडली होती. या विद्युत भारीत वाहिनीला श्री सावंत यांच्या म्हैशीला स्पर्श झाला आणि विजेच्या धक्क्याने सदर म्हैस जागीच ठार झाली. अन्य काही गुरे त्या परिसरात चरत होती मात्र, सुदैवाने ती वाचली. सध्या वादळी वारे वाहत असून पाऊसही कोसळत आहे. महावितरणकडून वीज वाहिन्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न केल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या घटनेत भालचंद्र सावंत यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. अनेक भागातील वीज खांब व वीज वाहिन्या जीर्ण झाल्या असून महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या मुक्या प्राण्याचा जीव गेला. श्री सावंत यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे. या घटनेनंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. या घटनेबाबत कुडाळ पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.














 
	
 Subscribe
Subscribe









