कुडाळ शहरात धाडसी चोरी

घरातील सर्व सदस्य उपस्थित असताना लाखोंचे दागिने लंपास

अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल

कुडाळ : कुडाळ शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर श्रीरामवाडी येथे स्मिता तांडेल यांच्या घरातून लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. याबाबत त्यांनी कुडाळ पोलिसात तक्रार केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्मिता तांडेल या आपले पती पुरुषोत्तम तांडेल, मुलगा राजेश तांडेल, सून दुर्गा तांडेल यांच्या समवेत कुडाळ श्रीरामवाडी येथे राहतात. मंगळवारी (दि. २१) लक्ष्मी पूजनानिमित्त त्यांनी चांदीचे नाणे (किंमत ४०००/-) व सोन्याच्या पाटल्या (किंमत २२,५००/-) या वस्तू पूजेसाठी लावल्या होत्या. पूजेचा विधी पूर्ण झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी १२.३० वाजण्याच्या सुमारास चांदीचे नाणे व सोन्याच्या पाटल्या एक डबीमध्ये भरून देव्हाऱ्याच्या वरती ठेवले. तर गळ्यातील मंगळसूत्र (किंमत १६२०००/-) पिशवीमध्ये काढून उशीच्या शेजारी ठेवले. पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारस त्यांना घरात कोणीतरी वावरत असल्याचा भास झाला. परंतु, त्यांच्या पतीचा व्यवसाय असल्यामुळे ते नारळ खरेदी करण्यासाठी नेहमीप्रमाणे पहाटे उठून जात असतील असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु पहाटे ४ वाजता त्यांचे पती नेहमीप्रमाणे उठले असता घराच्या मागचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरातील इतर सदस्यांना मागचा दरवाजा कोणी उघडा ठेवला असे विचारले ? त्यावेळी घरात सर्वत्र निरीक्षण केले असता घराच्या पुढील बाजूचा दरवाजा देखील उघडलेल्या स्थितीत होता. यानंतर सर्वांनी कपाट उघडून पहिले असता सर्व वस्तू सुरक्षित असल्याचे दिसून आले. त्यानंतर चांदीचे नाणे व पाटल्या असलेली डबी तसेच उशीजवळ पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र आढळून न आल्याने आपल्या घरात चोरी झाल्याची त्यांना खात्री पटली. स्मिता तांडेल यांनी याबाबतची तक्रार कुडाळ पोलिसात दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली होती. तसेच अधिक तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाच्या सहाय्याने मागोवा घेतला असता घराच्या मागील दारातून काही अंतरावर जाऊन श्वानपथक घुटमळले. त्या ठिकाणी पाहणी केली असता चांदीचे नाणे व सोन्याच्या पाटल्या ठेवलेली डबी रिकामी स्थितीत आढळून आली.

यावेळी घरच्यांकडून अधिक माहिती घेतली असता स्मिता तांडेल यांच्या सून दुर्गा तांडेल म्हणाल्या की, त्यांच्या सासूबाई स्मिता व सासरे पुरुषोत्तम तांडेल हे तळमजल्यावर झोपले होते. तर त्या स्वतः व त्यांचे पती राजेश हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास तहान लागली म्हणून त्या पाणी पिण्यासाठी उठल्या असता पायऱ्यांच्या लोखंडी रेलिंगला काहीतरी धडकल्याचा अस्पष्ट असा आवाज आला. परंतु आवाज अगदीच लहान असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कदाचित संबंधित चोरटा पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर येण्याच्या तयारीत होता. परंतु कोणाच्यातरी उठण्याची चाहूल लागल्यामुळे तो घटनास्थळावरून पळाला असावा. यावेळी घाईघाईत पळताना त्याची धडक पायऱ्यांना असलेल्या लोखंडी रेलिंगला लागली असावी असा अंदाज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

तरी संबंधित घटनेमध्ये २२,५००/- किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या, ४०००/- किंमतीचे चांदीचे नाणे व १६२०००/- किमतीचे मंगळसूत्र असे तब्बल १,८८,५००/- किमतीचे दागिने चोरीस गेले असून या घटनेची तक्रार कुडाळ पोलिसात करण्यात आली आहे. तर पोलीस संबधित चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

error: Content is protected !!