स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
सावंतवाडी : सावंतवाडी – आंबोली मार्गावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. यामध्ये ११ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सावंतवाडी – आंबोली मार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अजित सुखदेव जगताप (रा. मोहोळ) व पुंडलिक नामदेव बाबर (रा. पंढरपूर) यांच्यावर महाराष्ट्र अधिनियम कलम ६५ अ, इ, ८१, ८३ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये १० लाख रुपये किमतीची XUV 500 कार आणि १ लाख ६७ हजार ४०० रुपये किमतीच्या गोवा बनावटी दारूसह एकूण ११ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर महेश्वर समजीसकर यांनी केली.


Subscribe










