गुरांच्या बेकायदेशीर वाहतूकप्रकरणी कुडाळचे दोघे ताब्यात;

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

वैभववाडी : टेम्पोतून बेकायदेशीररित्या गुरे वाहतूक करत असल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी काल (ता. २) पहाटे भुईबावडा हेत फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सहा गुरांसह टेम्पो ताब्यात घेतला असून, यात ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील भडगाव येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजन पाटील, पोलिस हवालदार गणेश भोवड, आणि पोलिस कर्मचारी हरेष जायभाय हे खारेपाटण-गगनबावडा मार्गावर काल रात्री गस्त घालत होते. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास भुईबावडा हेत फाटा येथे खारेपाटणच्या दिशेने आलेल्या एका टेम्पोची (एमएच ०७, ओजे ४३१२) पोलिसांनी तपासणी केली.

या तपासणीत टेम्पोमध्ये सहा गुरे (तीन बैल आणि तीन गायी) आढळली. ही गुरे कोल्हापूरकडे नेत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ टेम्पो आणि गुरांसह तो ताब्यात घेतला. बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी टेम्पो चालक लेझरी पिटर डिसोजा (वय २७) आणि समीर मधुकर सावंत (३६, दोघेही रा. भडगाव, ता. कुडाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेली सहाही गुरे गोशाळेच्या ताब्यात देण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश भोवड अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!