वेंगुर्ला: शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच, तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे तीन जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सुरुवातीला, आठ जण समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. वाचवण्यात आलेल्या पर्यटकांपैकी चार जणांना तातडीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
बुडालेल्या पर्यटकांपैकी काहीजण कुडाळ येथील तर काहीजण बेळगाव (Belgaum) येथील असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे. घटनास्थळी सध्या बुडालेल्या उर्वरित पर्यटकांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा मदतकार्यात गुंतल्या आहेत. समुद्रात नेमके किती जण बुडाले आणि वाचवण्यात आलेल्या व मृत व्यक्तींची नावे याबद्दल सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नाही. अधिक तपास सुरू आहे.