जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी : प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स यांसारखा कचरा विघटन न होणारा असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक वापर शून्यावर आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा येथे केले.
आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत आचरा ते देवबाग समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्वतः मोहिमेत सहभागी होत प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स व अन्य कचरा गोळा केला.
यावेळी त्या म्हणाल्या सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या माध्यमातून वाढणारा प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनाच्या स्तरावर उपाययोजना होत असल्या तरी ‘प्लास्टिकमुक्त किनारा’ ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायतींवर पर्यटन हंगामात वाढत्या कचरा समस्येचा ताण जाणवतो. यावर योग्य नियोजन करून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेत मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पंचायत समितीचे अधिकारी, महसूल विभाग, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
















 
	

 Subscribe
Subscribe









