ब्युरो न्यूज: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सीचे भूकरमापक आणत आहोत. त्यांच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केल्याशिवाय आता दस्ताची नोंदणी होणार नाही.दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार होणार नाही, अशी पद्धत आता राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सेवा पंधरवडा या कार्यक्रमात महसूलमंत्री बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
या वेळी त्यांनी महसूल खात्याअंतर्गत विविध विभागांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला.कर्नाटक राज्याच्या धर्तीवर राज्यात खासगी एजन्सीच्या माध्यमातून मोजणी केल्यानंतर दस्त नोंदणी करण्याबाबत भूमिअभिलेख विभागात हालचाली सुरू होत्या. त्याबाबत महसूलमंत्री यांनी माहिती दिली. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की गेल्या ३० वर्षांमध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेल्या आपापसांतील वादाच्या पुणे विभागातील ३३ हजार तक्रारींपैकी सुमारे ११ हजार तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत.