गवारेड्याची धडक; शिक्षिका जखमी

घोडेमुख (फॉरेस्ट चौकी) येथील रस्त्यावर सावंतवाडी वरून आजगाव च्या दिशेने जाणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सृष्टी रविराज पेडणेकर (४८) या आपल्या ताब्यातील दुचाकी वाहनावरून आजगाव प्राथमिक शाळेत जात असताना त्यांना गव्या रेड्याने आज सकाळी पावणे सात च्या सुमारास जोरदार धडक दिली. त्यात त्या जखमी झाल्या. लागलीच त्यांना तेथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या रस्त्याने जाणारे आरोस हायकुल चे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी आपल्या गाडीत घालून त्यांना मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अदिती ठाकर यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडीला पाठविण्यात आले. यावेळी त्यांना सावंतवाडी येथे नेण्यासाठी शिक्षक दत्तगुरु कांबळी व सौ. रुपाली कोरगावकर यांनी मदत केली.

मात्र सध्या गव्यांच्या वावरामुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले असून, याचा नाहक त्रास येथील ग्रामस्थांना, वाहनधारकांना, शेतकऱ्यांना होत आहे. हाकेच्या अंतरावर फॉरेस्ट चौकी असून सुद्धा या गव्यांबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने ग्रामस्थामधून, शेतकऱ्यांमधून, वाहनचालकांमधून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!