सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

सिंधुदुर्ग : हवामान बदल, तापमानातील चढ-उतार, अवकाळी पाऊस, वाढती आर्द्रता तसेच कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव या आव्हानांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत हा दोन वर्षांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या समन्वयाने प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रायोगिक प्रकल्पात २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या माध्यमातून शेती क्षेत्राला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन आंबा व काजू बागांचे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स, IoT तंत्रज्ञान, उपग्रह छायाचित्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान आणि डिजिटल मॅपिंग यांचा एकात्मिक वापर करण्यात येणार आहे.

स्थानिक हवामान केंद्रे : तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि अन्य हवामानविषयक घटकांची प्रत्यक्ष वेळेतील माहिती उपलब्ध करून त्याआधारे शेतकऱ्यांना हवामानानुसार पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मृदा सेन्सर्स व IoT तंत्रज्ञान : जमिनीतील ओलावा व तापमान यांचे मोजमाप करून पिकांना आवश्यकतेनुसार पाणी व खत व्यवस्थापनाबाबत सल्ला देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवर मराठी भाषेत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

AI आधारित पीक निरीक्षण व उपग्रह तंत्रज्ञान : उपग्रह छायाचित्रे व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून पिकांची वाढ, आरोग्य आणि संभाव्य ताणाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. तसेच कीड व रोगांच्या संभाव्य प्रादुर्भावाबाबत वेळेवर पूर्वसूचना देण्याची व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.

ड्रोनद्वारे फवारणी व डिजिटल मॅपिंग : डोंगराळ भाग तसेच उंच झाडे असलेल्या बागांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणी व झाडांच्या आरोग्याचे डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे.

डिजिटल वॉर रूम व डॅशबोर्ड : प्रकल्पाच्या प्रभावी सनियंत्रणासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे डिजिटल वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे प्रकल्पाच्या डिजिटल डॅशबोर्डची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

AI आधारित अचूक हवामान अंदाज, कीड-रोगांची पूर्वसूचना आणि पीक व्यवस्थापनाच्या शिफारशींच्या माध्यमातून आंबा व काजू उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ साध्य करण्याचे अपेक्षित उद्दिष्ट आहे. तसेच पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या वापरामध्ये २० ते ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पात सहभागी ४०० शेतकऱ्यांना आधुनिक डिजिटल शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करता येणार असून ग्रामस्तरावर आधुनिक शेती पद्धतींच्या प्रसारास चालना मिळणार आहे.
जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कोकणातील फलोत्पादन क्षेत्रासाठी पथदर्शी ‘स्मार्ट शेती’ मॉडेल ठरण्याची अपेक्षा आहे. हवामानातील बदलांना सामोरे जाताना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!