खारमध्ये भरधाव कारची स्कुटरला धडक;
BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर
मुंबई : खार परिसरात भरधाव कारने स्कुटरला दिलेल्या धडकेत महानगरपालिकेच्या ४१ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून, आणखी एका दुचाकीस्वारालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकासह माजी ब्रिगेडियर आणि माजी खासदार सुधीर सीताराम सावंत (७१) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत अयप्पा हरिजन हे गेल्या वर्षभरापासून मुंबई महानगरपालिकेत कार्यरत होते. ते सांताक्रूझ येथे पत्नी नॅन्सी (३७) आणि दोन मुलांसह राहत होते. सोमवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास अयप्पा पत्नीला घेऊन स्कुटरवरून एका कार्यक्रमासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते.
दोघे खारमधील सी. डी. रोड आणि १६व्या रस्त्याच्या जंक्शनजवळ आले असताना मागून आलेल्या भरधाव पांढऱ्या कारने त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. धडकेमुळे नॅन्सी रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर अयप्पा कारखाली अडकले. याचवेळी कारने आणखी एका स्कुटरलाही धडक दिल्याने राहुल घाणेकर हे दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदत करत अयप्पा यांना कारखालून बाहेर काढले. त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. अयप्पा आणि नॅन्सी यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच अयप्पा यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर खार पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


Subscribe








