दोन गावच्या पोलीस पाटलांनी दाखवली माणुसकी.
केतन शिरोडकर /प्रतिनिधी
नातेवाईकांकडून आपल्या पिंगुळी देऊळवाडी येथील घरी परतण्यासाठी निघालेल्या सुमारे ७५ वर्षीय लिलावती रामचंद्र परब या वयोवृद्ध महिला प्रवासादरम्यान भरकटल्या. कोणतीही स्पष्ट माहिती देता न आल्याने त्या अखेर पावशी-शेलटे वाडी येथे पोहोचल्या. मात्र पावशी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलीस पाटलांच्या तत्परतेमुळे त्यांची ओळख पटवून त्यांना सुखरूप घरी पोहोचविण्यात आले.
पावशी-शेलटे वाडी परिसरात सदर वयोवृद्ध महिला आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. मात्र आपण नेमके कुठून आलो आणि येथे कसे पोहोचलो, याबाबत त्यांना व्यवस्थित माहिती सांगता येत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने पावशीचे पोलीस पाटील शेखर शेलटे यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच शेखर शेलटे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सविस्तर विचारपूस केली. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे तिच्या गावाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पिंगुळी देऊळवाडीचे पोलीस पाटील बाबली पिंगुळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच बाबली पिंगुळकर यांनी महिलेबाबत माहिती घेतली. महिलेचे वर्णन आणि मिळालेल्या माहितीनुसार त्या लिलावती रामचंद्र परब, रा. पिंगुळी देऊळवाडी असल्याची खात्री झाली.
यानंतर पावशीचे पोलीस पाटील शेखर शेलटे, पोलीस पाटील गंगाराम उर्फ सदा पारकर आणि पिंगुळी देऊळवाडीचे पोलीस पाटील बाबली पिंगुळकर यांच्या समन्वयातून लिलावती परब यांना सुखरूपपणे पिंगुळी देऊळवाडी येथील त्यांच्या घरी आणून पोहोचविण्यात आले.
या घटनेची माहिती पिंगुळी बीटच्या हवालदार ममता जाधव मॅडम तसेच पावशी बीटचे हवालदार परुळेकर साहेब यांना देण्यात आली. दरम्यान, लिलावती परब या सध्या एकट्याच राहत असल्याचे समोर आले. वयोमान लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारे एकटे प्रवास करावा लागू नये, तसेच नातेवाईकांनी त्यांची नियमित विचारपूस करून त्यांना आवश्यक आधार व सहकार्य द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांची संवेदनशीलता आणि पोलीस पाटलांची तत्परता यामुळे भरकटलेल्या वयोवृद्ध महिलेला वेळेत मदतीचा हात मिळाला आणि त्यांची सुखरूप घरवापसी झाली.


Subscribe










