देवगड : मिठबाव आडारीवाडी येथे घरगुती वादातून मुलाने वडिलांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी चिन्मय परशुराम लोके (२७) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम पांडुरंग लोके (६७) हे पत्नी आणि मुलगा चिन्मय यांच्यासह त्यांच्या मालकीच्या घरात स्वतंत्रपणे राहतात. घरगुती कारणावरून त्यांच्यात यापूर्वीही वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
२८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास परशुराम लोके हे देवपूजेसाठी आपल्या बागेतील फुले काढत होते. त्यावेळी चिन्मय तेथे आला आणि फुले काढण्यास विरोध केला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून चिन्मयने वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांवर लाकडी दांड्याने मारल्याने ते जखमी झाले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, परशुराम लोके यांच्याकडे काम करणाऱ्या शिवानी चव्हाण (५०) यांनाही संशयिताने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी परशुराम लोके यांनी देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चिन्मय लोके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Subscribe








