नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापनेसाठी अनुदानाची संधी

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी क्षेत्र विस्तार कार्यक्रमामध्ये नवीन उती संवर्धन (Tissue Culture) प्रयोगशाळा स्थापन करणे या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकांतर्गत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कृषी विद्यापीठे तसेच शासन अंगीकृत संस्थांना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के, कमाल २५० लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. उपलब्ध निर्मिती तंत्रानुसार मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे संबंधित प्रयोगशाळेस आवश्यक राहील. आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनाच या घटकांतर्गत प्रयोगशाळा मंजूर करण्यात येईल.

खासगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के, कमाल १०० लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. सदर प्रकल्प बँक कर्जाशी निगडित असणे आवश्यक आहे. तसेच उपलब्ध निर्मिती तंत्रानुसार मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे आवश्यक राहील.

उती संवर्धन प्रयोगशाळेस जैवतंत्रज्ञान विभागाच्या निर्धारित मानके व निकषांनुसार अनुदान प्राप्त झाल्यापासून १८ महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहील.

अनुदानाची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे :

सार्वजनिक उपक्रम (कृषी विद्यापीठे व सार्वजनिक संस्था/शासकीय प्रक्षेत्र) यांच्यासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा २५० लाख रुपये असून प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के अनुदान देय आहे. खासगी क्षेत्रासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा १०० लाख रुपये असून प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देय आहे.
नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करू इच्छिणाऱ्या संबंधितांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकांतर्गत अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!