जिल्ह्यात सात ठिकाणी विशेष संयुक्त रंगीत तालीम यशस्वी
सिंधुदुर्ग : चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी कमीत कमी ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पूर्वतयारी, परस्पर समन्वय आणि तातडीची प्रतिसादक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. वातावरणातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण आणि तीव्रता वाढत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी सदैव सज्ज राहावे. त्याचबरोबर नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपत्ती व्यवस्थापनात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी केले.
चक्रीवादळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या संयुक्त सहभागातून आज, दि. १ ऑक्टोबर रोजी आयोजित बहुराज्यीय रंगीत तालीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडली. वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट येथे विशेष संयुक्त रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मॅरीटाईम बोर्डाचे कॅप्टन संदीप भुजबळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, रेडी पोर्टचे व्यवस्थापक संदीप चव्हाण, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, रेडी गावचे सरपंच रामशिंग राणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मालवण तालुक्यातील तारकर्ली व आचरा, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, श्रीरामवाडी व शेळपी तसेच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग व तांबळडेग अशा सात ठिकाणी ही मॉक ड्रिल घेण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), पोलीस, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य संबंधित यंत्रणांनी यामध्ये सहभाग घेतला. चक्रीवादळाच्या परिस्थितीत आपत्कालीन संदेश प्राप्त झाल्यानंतर यंत्रणांचा प्रतिसाद, परस्पर समन्वय, बचाव व मदतकार्य, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष चाचणी यावेळी घेण्यात आली.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे १२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे चक्रीवादळासारख्या आपत्तींच्या दृष्टीने जिल्ह्याने विशेष दक्ष राहणे आवश्यक आहे. जिल्ह्याने यापूर्वीही विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. वातावरणातील बदलामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूर्वतयारी आणि सर्व यंत्रणांमधील समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये केवळ प्रशासकीय यंत्रणा किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तयारी पुरेशी नसून नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. रेडी पोर्टसारख्या महत्त्वाच्या आस्थापनांनी आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षा व्यवस्था आणि प्रतिसाद यंत्रणा कायम सक्षम ठेवावी. आपत्तीच्या काळात संभाव्य हानी कमीत कमी राहील, यादृष्टीने प्रत्येक आस्थापनाने आपत्कालीन कृती आराखडा अद्ययावत ठेवून त्यानुसार नियमित सराव करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.
आपत्तीच्या काळात रस्ते, दळणवळण व्यवस्था, मोबाईल नेटवर्क तसेच मदत व बचावकार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था किती प्रभावीपणे कार्यान्वित करता येते, विविध विभागांमध्ये समन्वय कसा साधला जातो आणि मदत किती वेगाने पोहोचविता येते, याची पडताळणी या रंगीत तालीममधून करण्यात आली. सरावादरम्यान समोर येणाऱ्या त्रुटी व उणिवांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक सुधारणा केल्यास प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देता येईल, असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी नमूद केले.
ही विशेष रंगीत तालीम केंद्रस्तरावरून आयोजित मॉक ड्रिलचा महत्त्वपूर्ण भाग होती. पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांची चक्रीवादळासारख्या आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी आणि विविध यंत्रणांची प्रतिसादक्षमता तपासण्याच्या दृष्टीने या सरावाला विशेष महत्त्व होते. जिल्ह्यातील सातही ठिकाणी विविध यंत्रणांच्या समन्वयातून नियोजित पद्धतीने मॉक ड्रिल पार पडली.
आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे अशा रंगीत तालमींकडे केवळ सराव म्हणून न पाहता प्रत्यक्ष आपत्तीपूर्व सज्जतेचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहणे आवश्यक आहे. आजच्या सरावातून प्राप्त अनुभव आणि निदर्शनास आलेल्या बाबींच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रेडी पोर्टचे व्यवस्थापक संदीप चव्हाण यांनी मानले.
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, श्रीरामवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, शेळपी येथे सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे मालवण तालुक्यातील आचरा पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर, तारकर्ली येथे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथे अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम व तांबळडेग येथे जगदीश काटकर, मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या सह सचीव मुग्धा धुरी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक बालाजी व्हरकट, व आपत्ती व मुंबई मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वित्तीय व्यवस्थापन सल्लागार, प्रकल्प सनियंत्रण गट (पॅलेडीयम) सागर वळांजू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रंगीत तालमीदरम्यान जिल्ह्यातील सात ठिकाणांहून एकूण ७०६ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. यामध्ये तारकर्ली ७५, आचरा ७४, श्रीरामवाडी १५०, शेर्ली ७०, रेडी पोर्ट ५०, विजयदुर्ग १२० आणि तांबळडेग १६७ नागरिकांचा समावेश होता. स्थलांतरितांमध्ये पुरुष ३७५, महिला २९५ आणि ५३ बालकांचा समावेश होता.
बचाव व मदत कार्यासाठी सातही ठिकाणी SDRF, NDRF, नागरी संरक्षण दल, पोलीस व होमगार्ड, अग्निशमन दल, आरोग्य पथके, स्वयंसेवी संस्था आणि आपदा मित्र यांचे मिळून सुमारे ६४२ मनुष्यबळ तैनात करण्यात आले. यामध्ये तारकर्ली येथे १५८, आचरा १०९, श्रीरामवाडी ७३, शेर्ली ६८, रेडी पोर्ट ६७, विजयदुर्ग ८० आणि तांबळडेग येथे ८७ मनुष्यबळाने विविध आपत्कालीन प्रतिसाद कार्यात सहभाग घेतला.






Subscribe







