सावंतवाडीत रेल्वेतून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

सावंतवाडी : तालुक्यातील सोनुर्ली-होळीचा खुर्द परिसरात रेल्वे मार्गालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रेल्वेतून पडल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगेश राजाराम केनी (२२, रा. रोणापाल, आरोसकर टेंब, ता. सावंतवाडी) यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सोनुर्ली-होळीचा खुर्द येथील मुंबई-गोवा रेल्वेमार्गाच्या बाजूला असलेल्या वहाळीत एक व्यक्ती मृतावस्थेत दिसून आली.

प्राथमिक माहितीनुसार, धावत्या रेल्वेतून प्रवास करताना संबंधित व्यक्तीचा टी-शर्ट झाडीत अडकला असावा. त्यामुळे तोल जाऊन तो रेल्वेतून खाली पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक लोहकरे, हवालदार पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल खुराडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, सावंतवाडी पोलीस तिची ओळख निश्चित करण्यासाठी तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धोत्रे करीत आहेत.

error: Content is protected !!