पतीकडून पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण

दारू पिण्यावरून वाद

कणकवली : दारू पिण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीला लाकडी आरामखुर्चीच्या दांड्याने मारहाण केल्याची घटना लोरे नं. १ येथे २ ऑक्टोबर रोजी घडली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्याला व पायाला दुखापत झाल्याची तक्रार कणकवली पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

सारिका स्वप्नील राणे (३०, रा. लोरे नं. १) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्या पती स्वप्नील राणे व मुलगा मिहीर यांच्यासोबत राहतात. त्यांच्या घराशेजारील खोलीत त्यांची सासू राहते.

फिर्यादीनुसार, २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वप्नील यांना त्यांच्या मित्राचा फोन आला होता. त्यावेळी सारिका यांनी पतीला दारू पिण्यावर मर्यादा ठेवण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या स्वप्नील यांनी घरातील लाकडी आरामखुर्चीचा दांडा घेऊन सारिका यांच्या डोक्यावर आणि पायावर प्रहार केला. त्यानंतर पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मारहाणीनंतर स्वप्नील यांनी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सारिका राणे यांच्या तक्रारीवरून स्वप्नील शशीकांत राणे (४०, रा. लोरे नं. १, फोंडाघाट) यांच्याविरोधात कणकवली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

error: Content is protected !!