“संकटावर मात, एकजुटीची साथ”

तेर्सेबांबर्डे परबवाडीत श्रमदानातून उभा राहिला ‘वनराई बंधारा’!

योगिता कानडे/कुडाळ : अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे आगामी काळात निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीची आणि संभाव्य तीव्र पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी परबवाडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून तेर्सेबांबर्डे येथील परबवाडी परिसरात ‘वनराई बंधारा’ यशस्वीरीत्या उभारण्यात आला.

स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे आणि भूजल पातळी टिकवून ठेवणे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर परबवाडीतील नागरिकांनी दाखवलेली ही जलसाक्षरता आणि सामाजिक कटिबद्धता संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दिशादर्शक व आदर्शवत ठरली आहे.

एकजुटीच्या ताकदीतून जलसमृद्धीकडे वाटचाल
“संघात्मक भावना आणि सामूहिक प्रयत्नांतून कोणतेही कठीण काम साध्य करता येते,” हे परबवाडीतील ग्रामस्थांनी या श्रमदानातून सिद्ध करून दाखवले आहे. या उपक्रमामुळे केवळ पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार नाही, तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठा हातभार लागणार आहे. परबवाडीच्या या अभिनव पुढाकारामुळे गावातील इतर वाड्यांनाही जलसंधारणाची कामे हाती घेण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.

या श्रमदान प्रसंगी परबवाडीतील ग्रामस्थ श्री. प्रवीण परब, श्री. राजन परब, श्री.सुनील परब, श्री.नागेश बांबर्डेकर,श्री.सुनील बांबर्डेकर, श्री.प्राजित परब,श्री.कृष्णा परब,श्री.प्रसाद परब, श्री. प्रकाश परब, श्री.कृष्णाजी परब, सरपंच श्री. रामचंद्र परब, श्री. महेंद्र मेस्त्री (ग्रामपंचायत सदस्य )उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा बंधारा पूर्ण करण्यात आला.

“पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया, उद्याचे भविष्य सुरक्षित करूया!”

जलटंचाईच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकसहभाग यांची सांगड घालणे काळाची गरज आहे. परबवाडीप्रमाणेच गावातील इतर सर्व वाड्यांमधील नागरिकांनी पुढे येऊन आपल्या परिसरात वनराई बंधारे व जलसंधारणाचे छोटे-मोठे उपक्रम राबवावेत. निसर्गाने दिलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करून गाव सुजलाम् सुफलाम् बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन वजा उदाहरण परबवाडी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गावाच्या समोर ठेवण्यात आले आहे..

error: Content is protected !!