सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य कक्षाची दुरवस्था

आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करणार

रुपेश पावसकर यांचा इशारा

ओरोस | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची सध्या दुरवस्था झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयालगत सदस्यांना विश्रांती तसेच चर्चा करण्यासाठी सदस्य कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अध्यक्ष पदभार स्वीकारून सुमारे सात महिने झाले असतानाही या कक्षाकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याचे पावसकर यांनी म्हटले आहे.
सदस्य कक्षातील आसन व्यवस्थेची अवस्था खराब असून, आसनातील कापूस बाहेर आलेला दिसत आहे. तसेच कक्षातील वॉटर कुलर बंद अवस्थेत असून, वरच्या बाजूला पंख्याचीही व्यवस्था नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांच्यासाठी वातानुकूलित कार्यालयीन व्यवस्था असताना, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न घेऊन येणाऱ्या सदस्यांसाठी असलेल्या कक्षाची अशी अवस्था का? असा सवाल पावसकर यांनी उपस्थित केला आहे.
“जिल्हा परिषद सदस्य हे सर्वसामान्य जनतेचा आवाज जिल्हा परिषदेत पोहोचविण्याचे काम करतात. त्यांच्यासाठी असलेल्या कक्षात मूलभूत सुविधा उपलब्ध असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.” अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, पुढील आठ दिवसांत सदस्य कक्षाची स्वच्छता करून आसन व्यवस्था, पंखा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच आवश्यक मूलभूत सोयी व्यवस्थित करण्यात आल्या नाहीत, तर जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खुर्च्या घेऊन बसण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला श्री. रुपेश पावसकर यांनी दिला आहे.
या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!