“संताप” फक्त गाणं नाही, Gen Z च्या प्रश्नांचा आवाज! “विषय खोल”चा रॅप चर्चेत
मुंबई : आजच्या Gen Z पिढीच्या मनात असलेले प्रश्न, अस्वस्थता आणि सामाजिक वास्तवावरचा आक्रोश रॅपच्या माध्यमातून व्यक्त करणारा रॅपर विषय खोल (Vishay Khxl) सध्या चर्चेत आहे. त्याचे ‘संताप’ हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग असून, शिक्षणव्यवस्था, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा संदेश या रॅपमधून देण्यात आला आहे. तरुणाईच्या मनातील भावना थेट आणि परखड शब्दांत मांडल्यामुळे या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

विषयच्या संगीतप्रवासामागे एमिनेमचा मोठा प्रभाव आहे. आपल्या पहिल्या फोनमध्ये फक्त एमिनेमची गाणी असल्याचे सांगताना तो म्हणतो की, “माझ्या लिखाणात, रॅपिंग सेन्समध्ये, म्युझिक सेन्समध्ये, फ्लोज आणि केडन्समध्ये एमिनेमने मला खूप प्रेरणा दिली.” मात्र त्याचा प्रवास थेट रॅपर म्हणून सुरू झालेला नाही. “मी आधी म्युझिक प्रोड्युसर आहे आणि नंतर रॅपर,” असे तो सांगतो. बीट्स तयार करण्यापासून त्याने संगीताची सुरुवात केली. विशेष म्हणजे संगीताशी कोणताही संबंध नसलेल्या मित्राकडे MPC किट असल्याचे त्याला एकदा स्वप्नात दिसले. त्या स्वप्नातील अनुभवातून त्याला बीट मेकिंगची उत्सुकता निर्माण झाली आणि पुढे म्युझिक प्रोडक्शनमधून त्याचा रॅपकडे प्रवास सुरू झाला.”

‘संताप’ या गाण्यामागे मात्र केवळ संगीताची प्रेरणा नसून सामाजिक परिस्थिती विषयीचा तीव्र आक्रोश आहे. जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी चांगल्या शिक्षणव्यवस्थेसाठी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीने विषय अस्वस्थ झाला. देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, आंदोलनादरम्यान झालेला अन्याय आणि महिला विद्यार्थिनींच्या झालेल्या अपमानाच्या घटनांनी त्याच्या मनात निर्माण झालेला संताप त्याने रॅपच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या संपूर्ण अनुभवातून ‘संताप’ या गाण्याची निर्मिती झाली.

“आपल्या आजूबाजूला चुकीच्या गोष्टी आणि अन्याय घडत असताना आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. जिथे चुकीचं दिसतं, जिथे अन्याय दिसतो, तिथे आवाज उठवला पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही,” असा स्पष्ट संदेश रॅपर विषय (Vishay Khxl) देतो. त्यामुळे ‘संताप’ हे केवळ एक रॅप साँग न राहता Gen Z च्या प्रश्नांना, अस्वस्थतेला आणि सामाजिक जाणीवेला आवाज देणारा ट्रॅक ठरत आहे. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहता विषय (Vishay Khxl) च्या या परखड रॅपची चर्चा आगामी काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.
https://youtu.be/EQnBhMRyn9o?si=0nuOSkVqmJTZzOF3


Subscribe










