शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चक्क नारायण राणे यांचे कौतुक केले आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर दावा केला नाही. उलट त्यांनी स्वतःचा पक्ष काढला याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं असं ते म्हणाले.
एरवी राणे कुटुंबीय नेहमीच संजय राऊतांसह उबाठा सेनेला नेहमीच शिंगावर घेत असतात. तर ठाकरे सेनेकडून देखील राणेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. आज मात्र एकदम उलट चित्र पाहायला मिळालं. “मी राज ठाकरे आणि नारायण राणे या दोघांचं नेहमी कौतुक करतो. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर कधीही शिवसेनेवर दावा केला नाही. नारायण राणे यांना पक्ष चालवायला जमला नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन स्वतःच राजकारण सुरू केलं. तर राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. मीच खरा पक्षप्रमुख माझी खरी शिवसेना असं त्यांनी कधीही म्हटलं नाही.” अशा शब्दात संजय राऊत यांनी दोघांचंही कौतुक केलं. एरवी टीका करण्याची संधी न सोडणाऱ्या संजय राऊत यांनी थेट नारायण राणेंचे कौतुक केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.