समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

मालवण : तारकर्ली येथील एमटीडीसी समोरील समुद्रात सातारा येथील तीन पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी बचावकार्य करतं दोघा पर्यटकांना समुद्राबाहेर काढून वाचवले. तर ऋषिकेश दारासिंग वाघमोडे (वय 24) हा समुद्रात बेपत्ता झाला. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडून आला.

सातारा येथील सहा तरुणांचा ग्रुप मालवणात पर्यटनासाठी आला होता. वायरी येथील होम स्टे मध्ये ते वास्तव्यास होते. सकाळी हे तरुण तारकर्ली येथे समुद्र किनारी दाखल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण तारकर्ली एमटीडीसी केंद्र समोर समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले. समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटत असतानाच लाटेच्या तडाख्यात यातील ऋषिकेश वाघमोडे यांसह अन्य दोघे पाण्यात बुडाले. यावेळी इतर तिघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्यावर असलेल्या ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक व मच्छिमार यांनी समुद्रात धाव घेतली. स्थानिकांनी दोघांना समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले. मात्र ऋषिकेश वाघमोडे हा समुद्रात बुडून बेपत्ता झाला. किनाऱ्यावर आणलेल्या दोघांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. उपचारानंतर या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, तारकर्ली समुद्रात बेपत्ता झालेल्या ऋषिकेश वाघमोडे याचा स्थानिक ग्रामस्थांकडून तसेच पोलीस यांच्याकडून समुद्रात शोध घेण्यात येत होता. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश वाघमोडे याचा मृतदेह सापडून आला. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!