आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने एपीएमसीच्या धर्तीवर कणकवली – नांदगाव मध्ये उभारणार भव्य मार्केट यार्ड
सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढून दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना
कणकवली : माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्गवासियांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या ५ क्रमांकात आणायचा विचार आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती काम करत आहेत. सिंधुदुर्ग चे अर्थकारण आंबा, काजू, कोकम, मासेमारी, पर्यटन यावर आधारित आहे. जिल्ह्याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकरी, मच्छिमार यांना ताकद देणे गरजेचे आहे. यासाठीच जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांसाठी एपीएमसी मार्केट मध्ये इथला आंबा गेल्यानंतर दलालांच्या विळख्यात शेतकरी सापडतो आणि मिळेल तो भाव पदरात पाडून घ्यावा लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर देवगड हापूस ला फार मोठी मागणी आहे आणि किंमत सुद्धा आहे. मात्र एपीएमसी मार्केट मधील दलालांमुळे आंबा बागायतदरांचे आर्थिक नुकसान होते. आंबा हे नाशवंत पीक असल्यामुळे योग्य वेळेत आंबा विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एपीएमसी मार्केट शिवाय पर्याय आजपर्यंत नव्हता. स्थानिक आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी यावर कायमचा उपाय करण्यासाठी एपीएमसी च्या धर्तीवर कोकणातील पहिले मार्केट यार्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव रेल्वे स्टेशन लगत उभारत असल्याची माहिती कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी दिली.काही महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मार्केट यार्ड अस्तित्वात येईल. या मार्केट यार्ड प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे राहणीमान उंचावेल असे आमदार नितेश राणे म्हणाले.यामुळे या भागातील आंबा, काजू, नारळ , सुपारी, कोकम, भात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा कोकणी मेवा, ताजे मासे, सुकी मासळी, अशा उत्पादनां बरोबरच वेगवेगळे लाकूड, खैर लाकुड व जंगली लाकूड यांची ने – आण करण्यासाठी सोयीचे होणार आहे. त्याचप्रमाणे कोकणात येणाऱ्या पालेभाज्या किंवा जीवनावश्यक वस्तू यांची या ठिकाणी स्टोरेज करून ते जिल्हाभर डिस्ट्रीब्यूट करण्याचा सर्वाधिक महत्वाचा असा हा उपक्रम यशस्वीरित्या साकार होत आहे.













