ठार मारण्याचा उद्देशाने अपहरण केल्याचा आरोप
चुकीची कलमे लावल्याचा वकिलांचा आरोप
घातपातामुळे ती कलमे योग्यच – पोलीस
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण-नाईकवाडी येथून मार्च २०२३ पासून बेपत्ता असलेल्या सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (३५) याला ठार मारण्याच्या उद्देशाने कारमधून नेऊन अपहरण केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट (कुडाळ), गणेश कृष्णा नार्वेकर (माणगाव), सर्वेश भास्कर केरकर (सातार्डा) व अमोल श्रीरंग शिरसाट (कुडाळ) या चौघांना गुरूवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही संशयितांना दि.१३ एप्रिल २५ पर्यंत म्हणजेच तीन दिवस पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.या घटनेत अजूनही तीन-चार जण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिदधीविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर हा सन २०२३ पासुन बेपत्ता झाल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. तसेच प्रकाश विरुदध कुडाळ न्यायालयात दारुबंदी अधिनयमाखाली दाखल गुन्हयात येत असलेल्या वॉरन्टाची बजावणी होत नव्हती.त्यामुळे प्रकाश बाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी शोध सुरु केला होता. पोलिसांकडुन प्रकाश बिडवलकर यांच्या घरी जावुन शोध घेण्यात आला होता मात्र प्रकाशच्या घरी त्याची मुकबधीर मावशी राहत होती.प्रकाश हा मार्च २०२३ पासुन घरी आलाच नसल्याचे मावशीच्या कडुन पोलिसांना समजुन आले.
प्रकाश बिडवलकर याचे नातेवाई कांमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे प्रकाशला मार्च २०२३ मध्ये पैशाच्या कारणावरुन सिदधेश अशोक शिरसाट,अमोल श्रीरंग शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर व सव्हेश भास्कर केरकर यांनी त्याला त्याच्या राहत्या घरातुन जबरदस्तीने कारमधुन घेवुन गेले, त्यादिवसापासुन प्रकाश बेपत्ता असल्याची माहीती पोलिसांना मिळून आली होती. हा सर्व प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने बेपत्ता प्रकाशचा संशयितांनी घातपात केला असल्याचा संशय असल्याने पोलीसांनी त्या दिशेने आपली तपास चक्रे वेगाने फिरवली. प्रकाश बिडवलकर याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण ( रा. चेंदवण ता कुडाळ) हिच्या तक्रारीवरुन ९ एप्रिल २०२५ रोजी प्रकाश बिडवलकर याचे अपहरण झाल्याचा गुन्हा निवती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला. त्यानंतर या घटनेतील संशयित नंबर एकचा आरोपी सिध्देश अशोक शिरसाट, (वय- ४४ रा. पानबाजार, ता. कुडाळ) याला कुडाळ पोलिस स्थानकचे पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर,काॅस्टेबल गणेश चव्हाण व योगेश मुंडे यांनी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने कोल्हापूर येथून बुधवारी ताब्यात घेतले. गणेश कृष्णा नार्वेकर, (वय- ३३ रा. माणगांव, ता. कुडाळ), सर्वेश भास्कर केरकर (वय-२९ रा. सातार्डा), अमोल उर्फ वल्लंभ श्रीरंग शिरसाट (रा. पिंगुळी ता. कुडाळ) यांना त्यांच्या-त्यांच्या घराकडून ताब्यात घेऊन बुधवारी अटक केली व सर्व आरोपींना गुरुवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही संशयतांना रविवार दि.१३ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास निवती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड हे करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल,अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले,उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उप निरीक्षक गणेश क-हाडकर, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संजय कदम, प्रितम कदम, रुपेश सारंग, निवती पोलीस टाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, नितिन शेडगे, मारुती कांदळगांवकर, आशिष किनळेकर यांनी केली आहे.
आरोपींवर पोलिसांनी चुकीची कलमं लावली- ऍड. बिले
प्रकाश बिडवलकर अपहरण प्रकरणी संशयित आरोपी क्र.२ गणेश नार्वेकर व संशयित आरोपी क्र.४ अमोल शिरसाटच्या वतीने एड. बिले यांनी बाजू मांडली.एड. बिले म्हणाले की सदरची घटना आहे दोन वर्षांपूर्वीची आहे. गोवा हद्दीत २५ लाख रुपयाचा ड्रग्स पकडल्यानंतर ड्रग्सच्या या प्रकरणावरुन दुसरीकडे लक्ष जावे म्हणून पोलिसांनी या खोट्या घटनेत संशयित आरोपींना अडकविण्याचा प्रयत्न केला आहे.आता या प्रकरणात समाजसेवक म्हणून आलेले लोक दोन वर्ष काय करत होते? या घटनेत आरोपी नंबर एक हा राजकीय नेता आहे.त्याला अशा प्रकारे बदनाम करणे योग्य नाही.पोलिसांनी या प्रकरणात सुप्रिम कोर्टाच्या गाईड लाईनचे पालन केलेले नाही.या घटनेतील बेपता मनुष्य कुठे गेला? हे अद्याप कुणाला माहिती नाही,कोर्टाने वाॅरट काढल्यानंतर मग समाज सेवकांना जाग आली.या प्रकरणात अपहरण,मर्डर आणि आरैपीचा काही संबंध नाही,मग संशयितांवर मर्डर मध्ये कलम लावणे चुकीचे आहे.आरोपींना निष्कारण तुरुंगात रहावे म्हणून पोलिसांनी ही कलमे लावली आहेत.अस्तिस्वात नसलेल्या कायद्याची कलमे सुध्दा पोलिसांनी लावलेली आहे.निवती पोलिस स्टेशन एका बाजूला आहे म्हणुन काय कायद्याचे वारे तिकडे गेले नाही का ? आरैपी सिध्देश शिरसाट व गणेश नार्वेकर हे आजारी आहेत. त्यामुळे संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळावी अशी विनंती ऍड. बिले यांनी केली.
संशयितांना पोलिस कोठडी देवू नये – ऍड. मांडकुलकर
संशयित आरोपी नंबर एक सिध्देश शिरसाट व सर्वेश केरकर यांच्या वतीने ऍड. विवेक माडगुळकर यांनी बाजू मांडली.सदरची घटना दोन वर्षांपूर्वीची आहे असे असताना या घटनेची तक्रार का केली नाही?या घटनेत तक्रारदार ही चुलत मामी आहे.अपहरण झालेल्या प्रकाशवर चार केसेस आहेत.माझा भाचा येत नाही याबाबत मावशीने नातेवाईकांच्या वतीने तक्रार का केली नाही? सोशल मिडीयावर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मावशीला व पोलिसांना समजलं कि प्रकाश बिडवलकर बेपत्ता आहे, त्याचं अपहरण झाले आहे. या घटनेत पोलिसांच्या हाती काहीच पुरावा नाही. बेपत्ता प्रकाशच्या वतीने सरकारी वकिलांनी मांडलेल्या युक्तीवादात संशयित आरोपींना पोलिस कोठडी देण्यासाठी ठोस कारण नाही, त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी अशी विनंती एड. मांडकुलकर यांनी न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षाच्या वतीने श्रीमती पाटील यांनी या घटनेतील आरोपी क्रमांक एक याच्यावर आतापर्यंत आठ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी क्रमांक दोन वर सुद्धा गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे संशयित आरोपींना पोलीस कोठडी द्यावी अशी न्यायालयाकडे विनंती केली.
प्रकाशचा घातपात केला.. म्हणून पोलिस कोठडी – पोलीस गायकवाड
प्रकाश बिडवलकर बेपता घटना ही दोन वर्षांपूर्वीची आहे.त्यामुळे जुनी कलमे लावण्यात आली आहेत. प्रकाश बिडवलकर हा सात वर्षे संशयित आरोपी नंबर एक सिध्देश शिरसाटकडे कामाला होता. आता गेल्या दोन वर्षांपूर्वी पासून तो दिसला नाही. प्रकाशचे अपहरण करून घातपात केला आहे. त्यामुळे संशयितांचे काॅल डिटेल्स काढायचे आहेत तसेच इतर माहिती मिळवायची आहे.म्हणुन पोलिस कोठडीची आवश्यकता आहे.तसेच संशयितांना राजकिय वरदहस्त सुध्दा असल्याचे तपासी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले.













