कणकवली : शहरातील मधलीवाडीनजीक सुतारवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास भर वस्तीत आलेल्या आग्या घोणस या विषारी सर्पाला जीवंत पकडून यश वर्दम आणि संकेत फोंडेकर या सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. शहरातील सुतारवाडी येथील श्री. चिंदरकर यांच्या घरानजीक शुक्रवारी सायंकाळी सर्प आढळून आला. घरालगतच्या एका पत्र्यामागे हा सर्प लपून राहिला होता. याबाबत सर्पमित्र यश वर्दम या युवकाला कळविल्यानंतर तो तेथे दाखल झाला. सदरचा सर्प म्हणजे आग्या घोणस जातीचा विषारी सर्प होता. यश वर्दम आणि संकेत फोंडेकर या दोघांनी आपल्यासोबतच्या सर्प पकडण्याच्या शिगेने हा सर्प शिताफीने एका बरणीत कैद करून नैसर्गिक अधिवासात सोडला.