सिंधुदुर्गनगरी : शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून ‘सामाजिक न्याय विभागा’च्या योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. 26 जानेवारी पासून हा चित्ररथ विविध गावांना भेटी देऊन योजनांची प्रसिध्दी करत असून 21 फेब्रुवारी पर्यंत हे प्रसिध्दी अभियान राबविण्यात येणार आहे. 1 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, देवगड आणि कुडाळ तालुक्यातील 128 गावांना भेटी देणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी कळविले आहे.
‘सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी झाले. या चित्ररथाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे देखील वाटप करण्यात येणार असल्याने सर्व योजनांची माहिती नागरिकांना मिळणार आहे.













