अखिल भारतीय मराठा महासंघाचे कुडाळ तालुका समन्वयक संतोष परब यांची मागणी
कुडाळ : कुडाळ बसस्थानक येथील पार्सल काउंटरवर फक्त रोख रकमेने व्यवहार होत असल्याने अनेक प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पार्सल काउंटरवर तातडीने QR कोडची सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे कुडाळ तालुका समन्वयक संतोष परब यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्त केले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, कुडाळ बस स्थानक येथे पार्सल काउंटरवर सध्या फक्त रोख रकमेने व्यवहार होत असल्याने अनेक प्रवाशांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या आपला देश डिजिटल इंडिया या प्रोजेक्ट वर काम करत असून जनतेने जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करणे अपेक्षित आहे. डिजिटल व्यवहारांच्या युगात रोख रकमेची उपलब्धता आणि सुट्टे रुपये हा मोठा प्रश्न ठरतो.
आजकाल अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिक QR कोडच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे पार्सल काउंटरवर QR कोड सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल आणि रोख रकमेच्या आणि सुट्टे रुपये यांच्या समस्याही सुटतील.
तरी आपण नम्र विनंती करतो की, पार्सल काउंटरवर तातडीने QR कोड सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल व बस सेवा अधिक कार्यक्षम बनेल.
अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे कुडाळ तालुका समन्वयक संतोष परब यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संतोष परब,कुडाळ तालुका समन्वयक शैलेश घोगळे, युवक तालुकाध्यक्ष हर्षद पालव,सोशल मीडिया प्रमुख जनार्दन सराफदार आदी उपस्थित होते.