आज विधानसभा सदस्य म्हणून मी शपथ घेतोय. माझ्यावर जबाबदारी मोठी असे म्हणत कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
२१ व्या शतकातील कुडाळ – मालवण मतदारसंघ हा जगाला दाखवण्यासाठी मला काम करायचे आहे. कुडाळ – मालवण मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिलेले आहे आणि जो माझा विजन डॉक्युमेंट आहे त्यानुसार मी १००% काम करण्याचा प्रयत्न करीन.
१९८५ पासून राणे कुटुंब राजकारणात आहे, जवळपास 39 वर्षे झाली व आज पर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये राणे कुटुंब आहे. २००९ ते २०१४ या पाच वर्षात मी खासदार म्हणून दीर्घ प्रवास अनुभवला तो केवळ जनता जनार्दनाच्या प्रेमाच्या आणि आशिर्वादामुळेच.आज या शुभक्षणी मला आठवण येतेय ती माझ्या कोकणवासिय जनतेची. तसेच राणे कुटुंबियांवरती प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे हा प्रवास यशस्वी झाला.
या क्षणी जनता जनार्दनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे. मी त्यांच्या प्रेमाला कधीही उतराई होणार नाही. या प्रवासात माझे पक्षश्रेष्ठी, पक्षातले सहकारी, शिवसेना व मित्रपक्षातले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याबद्दल देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो.
सर्वांचे प्रेम, आपुलकी यांच्या ऋणात सदैव राहणे मला आवडेल. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत असे त्यांनी शपथ घेतल्यानंतर म्हटले आहे.













