त्या महिलेच्या हत्येप्रकरणी सावंतवाडी येथील संशयिताला अटक

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून केली हत्या

डिचोली गोवा येथील चिकणे-कुडणे परिसराला हादरवून सोडणाऱ्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निघृण हत्येप्रकरणी फरार झालेल्या संशयिताला अखेर डिचोली पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, मृत महिलेच्या धाकट्या मुलीशी विवाह करण्यास नकार मिळाल्याच्या रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे चिकणे-कुडणे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. एका शांत परिसरात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. खून केल्यानंतर संशयित सागर राऊळ घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यामुळे डिचोली पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करत डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. संशयिताच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबईपर्यंत शोधमोहीम राबवली. आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा ठावठिकाणा शोधून काढला.

मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सागर राऊळ याला मीरा भाईंदर-ठाणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला तेथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण, पूर्वनियोजन होते का, तसेच आरोपी आणि पीडित कुटुंबीयांमधील संबंध याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

प्रेमप्रकरणातून निर्माण झालेला राग आणि त्यातून घडलेली ही थरारक हत्या सध्या गोवा आणि सिंधुदुर्ग परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

error: Content is protected !!