कणकवली पोलिसांची अवघ्या २४ तासांत शोधमोहीम यशस्वी
कणकवली : आशिये-वरचीवाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी (वय १८) ही महाविद्यालयीन तरुणी शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती तिचे वडील विठ्ठल देवळी यांनी तत्काळ कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती.
फिर्यादीनुसार, नुपूर ही दररोजप्रमाणे “कॉलेजला जाते” असे सांगून घरातून निघाली होती. मात्र ती दीर्घकाळ घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली. स्वतःच्या पातळीवर शोध घेऊनही ती सापडली नाही, परिणामी कुटुंबीयांनी पोलिसांकडे मदतीची धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी माहिती गोळा केली. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना तिचा ठावठिकाणा गगनबावडा परिसरातील एका खेडेगावात लागला.
सोमवारी सकाळी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन नुपूर हिला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तिला पालकांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण शोधमोहीमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत, पोलीस हवालदार तांबे, महिला पोलीस रेश्मा कांबळे आणि चालक महामुनी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कणकवली पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि प्रभावी समन्वयामुळे ही शोधमोहीम अल्पावधीत यशस्वी ठरली. या कामगिरीबद्दल कणकवली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालक आणि स्थानिक नागरिकांनी पोलिस दलाचे आभार व्यक्त केले आहेत.















 
	

 Subscribe
Subscribe









