वेंगुर्ला – मठ परिसरात भरधाव कारचा अपघात

अपघातानंतर कारचालक तरुणाचा पोलिसांवरच हल्ला

वेंगुर्ला : तालुक्यातील मठ परिसरात एका तरुणाने भरधाव गाडी चालवत केलेल्या अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईप्रसाद उर्फ गोट्या विजय नाईक (वय 32, रा. आडेली) असा या इसमाचा नाव असून, त्याने मारुती सुझुकी एर्टिका (क्र. MH-07-AS-9796) ही गाडी अतिवेगात चालवत मठ हायस्कूलच्या भिंतीला धडक दिली.

या अपघातानंतर घटनास्थळी गस्त घालत पोहोचलेल्या पोलीस निरीक्षक ओतारी यांनी चौकशी केली असता, संबंधित इसमाने पोलिसांनाच शिवीगाळ करत दमदाटी केली. सदर इसमास पो.नि. ओतारी यांनी वैद्यकीय उपचार आणि पुढील कायदेशीर कारवाई साठी शासकीय वाहनात बसण्यास सांगितले असता, तो गाडीत बसण्यास तयार नसल्याने स्थानिक लोकांच्या मदतीने शासकीय वाहनात बसवत असताना, त्याने ओतारी यांचा गणवेश पकडून त्यांना धक्काबुक्की केली, दरम्यान मध्ये आलेल्या पो.ना. स्वप्नील तांबे यांना उजव्या हाताला नखांनी ओरबाडले. त्याला हिंस्त्रक झालेले पाहिले असता, पो. हवा. डिसोजा यांनी त्याला पकडले. त्यावेळी सदर इसमाने पो. नि.ओतारी, पो.हवा. डिसोजा आणि पो.ना. तांबे यांना तुम्हाला उद्या सकाळी जीवंत सोडणार नाही. माझी मोठी ओळख आहे. अशी धमकी देऊन डिसूझा यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर चावा घेतला.

या घटनेनंतर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात साईप्रसाद विजय नाईक यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांवरील हा हल्ला गंभीर मानला जात असून पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!