सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश

जिल्ह्यात जमीन महसूलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती

सिंधुदुर्ग : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्व आठही तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच पालकमंत्री उद्या, दि. २७ सप्टेंबर रोजी दुष्काळी परिस्थिती भागातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करणार आहेत.

‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट यांचा समावेश आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे.

दरम्यान, शासन निर्णयानुसार Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेट्स संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण, देवगड, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येणार असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती व मदतीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

error: Content is protected !!