२० वर्षीय तरुणाचा मृत्यू
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव येथील जोशी-मांजरेकरवाडी सर्कलजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नामदेव उमेश आजगावकर (वय २०, रा. मळगाव) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव आजगावकर हा आपल्या नातेवाईकासोबत दुचाकीवरून मळगाव जोशी-मांजरेकरवाडी सर्कल परिसरात रस्ता ओलांडत होता. याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा पंच कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. नामदेव गंभीर जखमी झाला, तर दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नामदेवला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, जखमी नातेवाईकाला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील आणि पोलीस कर्मचारी अनिल धरी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Subscribe









