पिंगुळीत ११ दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

नाचत-गाजत मिरवणुकीत भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

केतन शिरोडकर /पिंगुळी

अकरा दिवस भक्तीभावाने पूजलेल्या गणरायाला पिंगुळीत गुरुवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ येताच आनंदासोबतच भाविकांच्या मनात विरहाची भावना दाटून आली. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने पिंगुळीचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
गणरायाच्या विसर्जनानिमित्त गावातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि गणरायाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, युवती, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महिलांनी आणि युवतींनी पारंपरिक फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. तर भाविकांनी नाचत-गाजत, जल्लोष करत बाप्पाला निरोप दिला. मिरवणुकीत भक्ती आणि उत्साहाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. बाप्पाच्या नामघोषाने वातावरण भारावून गेले होते.
गेल्या अकरा दिवसांत गणरायाच्या उपस्थितीने घराघरांत भक्तीचा आणि आनंदाचा माहोल निर्माण झाला होता. त्यामुळे विसर्जनाच्या वेळी ‘बाप्पा पुन्हा कधी येणार?’ अशी हुरहूर अनेकांच्या मनात होती. बाप्पाला निरोप देताना काही भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मिरवणूक विसर्जनस्थळी पोहोचल्यानंतर गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
अकरा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात पार पडला असला तरी बाप्पाच्या आगमनाने दिलेला आनंद, भक्ती आणि एकोप्याच्या आठवणी भाविकांच्या मनात कायम राहणार आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’ या भावनिक घोषणेसह पिंगुळीत गणरायाला निरोप देण्यात आला.

error: Content is protected !!