पत्रकार विकास गावकर यांना ‘मुक्तपीठ सन्मान २०२६’; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

टीव्ही ९ मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना ‘मुक्तपीठ सन्मान २०२६’ पुरस्कार मिळाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत पुरस्कार प्रदान.

मालवण : टीव्ही ९ मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी आणि पत्रकार विकास गावकर यांना माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गावकर यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व लेखक तुळशीदास भोईटे लिखित ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात पक्षांतराचा इतिहास, संबंधित कायदे, न्यायालयीन निर्णय तसेच लोकशाही आणि संविधानासमोरील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, अर्थतज्ज्ञ व माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार व नाटककार ज्ञानेश महाराव, विचारवंत व लेखक संजीव खांडेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात माध्यम क्षेत्रातील विविध विभागांत उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकार आणि माध्यमकर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. डिजिटल माध्यमातील कामगिरीसाठी साहिल जोशी, राजकीय संपादनासाठी यदु जोशी, टीव्ही संपादन व विशेष कार्यक्रमातील अँकरिंगसाठी सरिता कौशिक, पश्चिम महाराष्ट्रातील रिपोर्टिंगसाठी रवींद्र कांबळे, तर कोकणातील रिपोर्टिंगसाठी विकास गावकर यांचा सन्मान करण्यात आला.
मुक्तपीठ सन्मानांतर्गत पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रातील विविध विभागांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये अँकरिंग, संपादन, रिपोर्टिंग, इनपुट-आउटपुट, ग्राफिक्स, व्हिडीओ एडिटिंग, व्हिडीओ जर्नलिझम, पीसीआर आणि ब्युरो चीफ अशा विविध विभागांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील विविध मान्यवर आणि मुक्तपीठ टीममधील सदस्यांचाही गौरव करण्यात आला. या उपक्रमातून पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्या विविध व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यात आली.
विकास गावकर यांना मिळालेल्या या सन्मानामुळे सिंधुदुर्गातील पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या कामाची दखल राज्यस्तरावर घेतली गेल्याचे अधोरेखित झाले आहे.

error: Content is protected !!