सावंतवाडी येथे गुरुवारी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

सावंतवाडी : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सावंतवाडीत गुरुवारी ता २४ रोजी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस, डॉक्टर फॅटर्निटी क्लब आणि श्री औदुंबर स्वामी मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस लाईनसमोरील श्री औदुंबर स्वामी मंदिरात हे शिबिर होणार आहे.
शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सावंतवाडीचे डीवायएसपी राजेश भागवत, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी पालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विशाल रेडी, सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत चितारी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांच्यासह विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात येणार असून, उपस्थित रुग्णांना मोफत औषधांचेही वाटप केले जाणार आहे.

‘आयुष्मान भारत’ कार्डही मोफत

शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे पात्र नागरिकांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत ‘आयुष्मान भारत’ कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आरोग्य तपासणीसह शासकीय आरोग्य योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
याचवेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा. तसेच रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घेत रक्तदान करावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!